अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर शहराजवळील तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या अखेर आज दि. २८ रोजी पहाटे चार वाजता पिंजऱ्यात जेरबंद झाला. या घटनेमुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
शहरालगतच्या तपोवन परिसरातील बुऱ्हानगर हद्दीत कराळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना, सोमवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी दीडच्या सुमारास बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली होती. त्यानंतर तात्पुरती ऊसतोड थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अविनाश तेलोरे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिंजरा लावून ड्रोनद्वारे परिसराची टेहळणी केली.
दरम्यान, पिल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाने पिलांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, पिलांजवळ मादी बिबट्या गुरगुरत धावून येत होती. चार दिवसांनंतर, 28 नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास ही मादी बिबट पिंजऱ्यात अडकली. वन विभागाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे की, जेरबंद झालेली ही मादी याच पिलांची आई असावी.



