पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ
शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी
सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. जिजाबा गवळी वस्तीजवळ शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी रात्री सुपा गावातील सफलता हॉटेलच्या मागे बिबट्याने शेतकरी आकाश पवार यांच्या शेळीवर हल्ला करून ती फस्त केली. गावालगतच घडलेली ही घटना पाहून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गावातील सरपंच मनीषा रोकडे, माजी उपसरपंच सागर मैड आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊ निवडूंगे यांनी या धोक्याबाबत वन विभागाला माहिती दिली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अप्सर पठाण, वनमजूर काशिनाथ पठारे व चालक दिगंबर विरोळे यांच्या पथकाने पहाटे बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश मिळवले.
वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे. एक बिबट्या पकडला असला तरी परिसरात अजून बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
वन विभागाचे आवाहन
“सुपा परिसरात पिंजरे बसवले असून अजून बिबटे असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी जागरूक राहावे आणि पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.”
— अप्सर पठाण, वनरक्षक
ग्रामस्थांचा इशारा
“गावालगतच बिबट्याचा वावर आहे. तीन-चार पिंजरे बसवून मोहीम हाती घ्यावी. ग्रामस्थांनीही सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.”
— भाऊ निवडूंगे, सामाजिक कार्यकर्ते