कान्हूर पठार | नगर सह्याद्री:-
कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे बुधवार दि 16 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पंढरीनाथ भिका बर्डे (वय 37) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर समजलेली माहिती अशी की, पंढरीनाथ बर्डे (रा.भिल्ल वस्ती,कान्हूरपठार) हे सकाळी विहरिवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते .त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने आधी कुत्र्यावर हल्ला केला, ते कुत्रे बर्डे यांच्या दिशेने धावून गेल्याने बिबट्याने बर्डे यांच्यावर देखील हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये त्यांच्या दोन्ही हाताला व डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांनीही जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्याने तेथून पलायन केले. त्यांना तातडीने कान्हूरपठार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाची तातडीने दखल घेत वनपाल नीलेश बढे, भीमराव दवणे, सरपंच संध्या ठुबे, गणेश तांबे,श्रीकांत ठुबे, गोकुळ लोंढे,बबन व्यवहारे, योगेश नवले यांनी जखमीची विचारपूस करून पंचनामा केला.
या आधी बिबट्याने गांवातील शेळ्या, मेंढ्या, कुत्रे,यांना आपले भक्ष्य केले आहे.परंतु मनुष्यावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कान्हूरपठार परिसरात शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या परिसरात पिंजरा लावण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने तातडीने वनपाल नीलेश बढे व भिमराव दवणे यांना निवेदन देण्यात आले. नवलेवाडी या ठिकाणी लावण्यात आलेला पिंजरा त्याठिकाणी संध्याकाळ पर्यत लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. डोंगरावरील गवत अंधश्रद्धेच्या भावनेतून पेटवून देत असल्याने बिबटे हे मानवी वस्ती कडे वळत आहेत.