संगमनेर । नगर सहयाद्री:-
शेतातील बागेत डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. १६) सकाळी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारातील राहिंज वस्ती (सुतार ओढा) येथे घडली. अनिता रमेश वाकचौरे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
वाकचौरे वस्तीवरील अनिता वाकचौरे शेतात डाळिंब तोडत असताना बिबट्याने अचानक पाठीमागून झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या गालावर व हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना घडली त्यावेळी अनिता वाकचौरे या पतीसमवेत शेतात काम करत होत्या. दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणात हल्ला करून त्यांना जमिनीवर पाडले. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने रमेश वाकचौरे धावत आले. त्यांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावले. मात्र, तोपर्यंत अनिता गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक राकेश कोळी, दौलत पठाण, ओंकार गोर्डे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यापूर्वी शेडगाव येथे एका चिमुकल्यावर, तसेच रायतेवाडी येथे १७ वर्षीय मुलावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आठवडाभरात तीन घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.