निघोज | नगर सह्याद्री
बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून खाणाबा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता मळगंगा ज्वेलर्सचे मालक महेश लोळगे यांच्या फॉर्महाउसवरील कुत्र्यावर बिबट्यानीे हल्ला केला आहे. मात्र परिसरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने हे कुत्रे बचावले मात्र जखमी झाले आहे.
विशेष म्हणजे हा बिबट्या मादी जातीचा असून तिची तीन पिल्ले या परिसरात आहेत, अशी माहिती प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र लंके यांनी दिली. याबाबत लंके यांनी पारनेर येथील वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून तातडीने पिंजरा देऊन सहकार्य करण्याची मागणी केली. मात्र तालुयात पिंजर्याची संख्या कमी असून सध्या देता येणार नाहीत असे या अधिकार्यांनी सांगितले.
गेल्या महिनाभरापासून या बिबट्याचा हैदोस सुरू असून कधी कुंड परिसर तर कधी खंडोबा पाउतके परिसर तसेच गुणोरे, गाडिलगाव या परिसरात या बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्परतेने कारवाई करावी व निघोज व परिसरात किमान दोन ते तीन पिंजरे तातडीने देण्याची मागणी जनतेतून होत आहे.