प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दत्तनगर येथे १०१ घरकुलांचे भूमिपूजन
श्रीरामपूर : नगर सह्याद्री
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण फेज वन येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून घरकुलांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विधिवत पूजा करण्यात आली तसेच दत्तनगर ग्रामस्थांच्या वतीने डॉ. सुजय दादांची पेढा तुला व सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांनी हा सत्कार स्वीकारून उपस्थित सर्वांशी संवाद साधला.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट शब्दांत राजकारणाची दिशा ठरवणारे विचार मांडले. “राजकारण छोट्या गोष्टीवर न होता, गरिबांना घर, शेतकऱ्यांना वीज आणि शिक्षण मिळाले पाहिजे. श्रीरामपूर बदलायच असेल तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम करावं लागेल,” असे ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. परंतु गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेण्यात आल्याचा विशेष आनंद देखील त्यांनी बोलताना व्यक्त केला.
६०० घरांची घोषणा – सोलर युक्त घरकुलांची उभारणी
डॉ. विखेंनी जाहीर केले की, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीरामपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६०० नवीन घरकुलं मंजूर झाली असून, ही घरं सोलर सिस्टिमसह उभारण्यात येणार आहेत. यामध्ये दत्तनगर हे एकत्रित केंद्र असणार आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीला “थारा” नव्हे, “धक्का” – कडक इशारा
शहरातील वाढती गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, खंडणी व महिलांवरील अत्याचार यावर भाष्य करताना डॉ. विखे म्हणाले, कोणताही समाज असो, गुन्हेगारी प्रवृत्तीला समर्थन देणार नाही. अशांना उखडून फेकलं जाईल. श्रीरामपूरच्या कायदा व सुव्यवस्थेवर कठोर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महामानवांची जयंती – डीजे नव्हे, उपक्रमातून साजरी करा
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले की, महामानवांच्या जयंतीत डीजे किंवा अनावश्यक खर्च न करता आरोग्य शिबिर, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले पाहिजे. विचारांशी नातं जोडण्याचा खरा मार्ग तोच आहे.
“पद माणसामुळे मोठं होतं, पदामुळे माणूस नव्हे”
जनतेची कामं करा, जनता आपल्याला नेता बनवते. त्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नसते, असा मार्मिक सल्ला देखील सुजय विखेंनी संभाव्य नगरसेवकांना दिला.
श्रीरामपूरसाठी ही सुरुवात आहे; आता मी इथे सातत्याने येणार!
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ही फक्त सुरुवात आहे, श्रीरामपूरला आता मी वारंवार भेट देणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक दृष्टीने काम करूया, असं देखील मत मांडून विकासाला प्राधान्य देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक अण्णा पठारे, नानासाहेब शिंदे, शरद नवले, गणेश गुदगुले, अभिषेक खंडागळे, सुरेंद्र थोरात, सारिका ताई, संगीता शिंदे, गिरधर अलके, भीमा बागूल तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.