अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कत्तलीसाठी डांबून ठेवलेली ४० गोवंशीय जनावरांची सुटका नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून पोलिसांनी केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली असून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्ष दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अरुण मोरे यांचे पथक तयार करून अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले.
२६ एप्रिल रोजी पथकाला गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. पथकाला संकेत साळवे व रवि आल्हाट यांच्या राहत्या घरासमोर गोवंशीय जातीचे जनावरे निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसले. पोलिसांनी तेथील इसमांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला. संकेत उर्फ सनी सुरेश साळवे (वय २७) यास ताब्यात घेतले. रवी आल्हाट (रा. झापवाडी रोड, घोडेगाव, ता. नेवासा) पूर्ण नाव माहीत नाही हा फरार झाला आहे. इर्शाद कुरेशी, शन्या कुरेशी, बाबू पठाण व रवी आल्हाट यांच्या मालकीची असल्याचे सांगून ही जनावरे कत्तल करण्याकरिता डांबून ठेवले असल्याची माहिती सांगीतली.
पथकाने गोवंशीय जातीची लहान मोठे ४० जनावरे असा मिळून १६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपीस जप्त मुद्देमालासह सोनई पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर मुरलीधर माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे येथे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.