अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कर्जत शहरातील भांडेवाडी परिसरातील अवैधरीत्या सुरु असलेल्ल्या गुटखाविक्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. कारवाईत ३ लाखांचा मुद्देमालासह ३ आरोपींना जेरबंद केले असून, एक जण फरार आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोउपनि. समीर अभंग, अंमलदार रमेश गांगर्डे, हृदय घोडके, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे व अरुण मोरे यांचा समावेश होता. दि. २९ सप्टेंबर रोजी पथक कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे भांडेवाडी परिसरात छापा टाकण्यात आला.
येथे सचिन सोपान झगडे (वय ४२) आणि स्वप्नील बबन सोनवणे (वय २३) हे अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा विकताना आढळून आले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून २ लाख ६८ हजार ५६६ रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा व पानमसाला तसेच ३२ हजार रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी सदरचा गुटखा भाऊसाहेब किसन सकुंडे (रा. मदनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडून आणला असल्याची कबुली दिली असून तो सध्या फरार आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.