४२ जनावरांची सुटका । १ कोटी २ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेवासा | नगर सहयाद्री
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४२ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. एलसीबीने केलेलया कारवाईने अवैध जनावर कत्तलीच्या रॅकेटला मोठा हादरा बसला आहे.
मंगळवार दिनांक १७ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. फिरोज रशीद शेख (रा. घोडेगाव) व पापा कुरेशी (रा. आळेफाटा, जि. पुणे) यांनी घोडेगाव येथील घराजवळील जागेत कत्तलीच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला.
छाप्यात २७ लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक, १५ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो, ३० लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक,५ लाख रुपये किंमतीची मारूती सुझुकी कंपनीची वॅगनर कार, ३ लाख रुपये किंमतीची मारूती सुझुकी अल्टो कार अशा वाहनांमध्ये ४२ गोवंश जनावरे सापडली. घटनास्थळी अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये निलेश शिंदे (रा. उंबरगाव), शाहरूख शेख (रा. घोडेगाव) आणि भारत शहाराव (रा. फत्तेपुर) यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान फरार आरोपी फिरोज रशीद शेख व पापा कुरेशी हे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सदर गुन्ह्याची नोंद सोनई पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संबंधितांवर महाराष्ट्र पशूसंरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, बिरप्पा करमल, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, आकाश काळे, बाळसाहेब गुंजाळ, रविंद्र घुंगासे व उमाकांत गावडे यांनी केली आहे.