अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
ओबीसी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात हाके यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्याहून अहिल्यानगरकडे जात असताना हाके यांच्या वाहनावर दगडफेक झाली. या हल्ल्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच गाडीवर हल्ले करून घेतात. स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही,असा टोलाही लगावला.
छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ही सर्व नाटके प्रसिद्धीसाठीच आहेत. हे लोक दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात आणि मग त्यावर राजकारण करतात. अशा जातीवाद पसरवणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं कारण नाही, असा घणाघात त्यांनी केला. या घटनेनंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून हल्ला नेमका कोणी आणि का केला, याचा तपास सुरू आहे.