Politics News: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी मंत्र्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात येणार आहे हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नाही. त्यातच आज हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच महायुती सरकारचे खातेवाटप होणार असल्याचे बोललं जात आहे. पुढच्या काही तासात महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्वच आमदारांना चहापानसाठी बोलावण्यात आले आहे. राज्याचे अधिवेशन संपल्यावर म्हणजेच आज 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खातेवाटपाचे पत्र राजभवनला पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा पदभार घेण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेंचा प्रवास
वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे माध्यमांपासून दूर होते. काल रात्री उशिरा धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या सर्व प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे, असे त्यांनी म्हटले. वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आज सकाळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला विजयगड या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.
कोणाला कोणते खाते मिळणार
चंद्रशेखर बावनकुळे (उर्जा), राधाकृष्ण विखे पाटील (महसूल), हसन मुश्रीफ (कृषी), चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण), गिरीश महाजन (आरोग्य व कुटुंब कल्याण), दत्ता भरणे (अन्न व नागरी पुरवठा), आदिती तटकरे (महिला व बालकल्याण), गुलाबराव पाटील (जलसंपदा), गणेश नाईक (कामगार), दादा भुसे (पर्यावरण), संजय राठोड (आदिवासी विकास), धनंजय मुंडे (सहकार व वस्त्रोद्योग), मंगलप्रभात लोढा (गृहनिर्माण), उदय सामंत (उद्योग विभाग), जयकुमार रावळ (पर्यटन व सांस्कृतिक), पंकजा मुंडे (सामाजिक न्याय), अतुल सावे (अल्पसंख्याक विकास), अशोक उईके (पशुसंवर्धन), शंभूराज देसाई (सार्वजनिक बांधकाम), राज्यमंत्री व त्यांचे खाते – माधुरी मिसाळ (कृषी व संशोधन), आशिष जयस्वाल (ऊर्जा), पंकज भोयर (नगरविकास), मेघना बोडकर साकोरे (जलसंपदा), इंद्रनील नाईक (शालेय शिक्षण), योगेश कदम (पशुसंवर्धन व दुग्ध विकास).