अहमदनगर । नगर सहयाद्री:-
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवत आहे. मंगळवारी या अभियानाच्या जनजागृतीसाठी अहमदनगर महानगरपालिका, अशोका आर्ट फाऊंडेशन व अहमदनगर आर्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफेसर चौक येथे स्वाक्षरी मोहीम पार पडली.
तर, बुधवारी सकाळी अहमदनगर महानगरपालिका व श्रीराम रनर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅक एलिफंट भुईकोट किल्ल्याजवळ मॅरेथॉन रनचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये नागरिकांसह, विद्यार्थी, अंध व दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
उपायुक्त विजयकुमार मुंढे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, चित्रकार अशोक डोळसे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद दिला. महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांसह अभियानात विशेषतः विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला.
त्यानंतर बुधवारी सकाळी अहमदनगर महानगरपालिका व श्रीराम रनर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅक एलिफंट भुईकोट किल्ल्याजवळ मॅरेथॉन रनचे आयोजन करण्यात आले होते. उपायुक्त विजयकुमार मुंढे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, उद्योजक गौरव फिरोदिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. या मॅरेथॉन रनमध्ये नागरिकांसह अंध व दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने बुधवारी दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता झोपडी कॅन्टीन, सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात देशभक्तीपर गीतांच्या सुरेल मैफलीचे आयोजन महानगरपालिकेने केले आहे. या कार्यक्रमात देशासाठी कार्य करणाऱ्या शहरातील स्वातंत्र्यसेनानींचा सन्मानही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी केले आहे.