मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना अजूनही सप्टेंबर महिन्याचा ₹१५०० हप्ता मिळालेला नाही. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतरही हप्ता न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दर महिन्याला दिला जाणारा ₹१५०० चा हप्ता यंदा पुन्हा एकदा लांबणीवर गेला असून, सप्टेंबरचा हप्ता अद्यापही बँक खात्यांत जमा झालेला नाही. अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत स्पष्टता देतील, अशी शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, सणाचे औचित्य साधून सरकार सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वितरित करू शकते. तसेच हप्ता आणखी लांबल्यास, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, योजनेच्या लाभासाठी केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, दोन महिन्यांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मंत्री तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियावरून KYC संदर्भात मार्गदर्शन केलं असून, लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.