मुंबई । नगर सहयाद्री: –
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली महत्वाची योजना आहे. २०२३ च्या जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, दरमहा दीड हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत नऊ हप्ते वितरित झाले आहेत.
सध्या ही योजना आर्थिकदृष्ट्या सरकारवर ताण आणत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेत वळवला जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र या सर्व चर्चांना बाजूला ठेवत राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की, योजना सुरूच राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थींना दरमहा दीड हजार रुपये ऐवजी २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप २१०० रुपये देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?
या चर्चांदरम्यान राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. जे हप्ते रखडले आहेत, ते पुढच्या महिन्यात दिले जातील. काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही हप्ते दिले गेले, त्यांचा आढावा घेतला जात आहे. तसेच, एप्रिल महिन्याचा हप्ताही लवकरच वितरित केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना लवकरच थकित हप्त्यांचा दिलासा मिळणार आहे.