मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे आता या योजनेचा ऑगस्टचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणेशोत्सवाच्या आधी मिळेल, अशी अपेक्षा अनेक महिलांनी व्यक्त केली होती. मात्र, हप्ता वेळेत न मिळाल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. आता सप्टेंबर महिना सुरू होऊनही १० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता की, पैसे कधी खात्यात येणार? या पार्श्वभूमीवर महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाईल. असे सांगितले होते.
आता प्रत्यक्षात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी करून चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या योजनेसाठी एकूण ३९६० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात एकूण २ कोटी ४८ लाख लाभार्थी नोंदणीकृत आहेत. आतापर्यंत जुलैपर्यंतचा लाभ म्हणजेच १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. आता लवकरच पुढील हप्ता देखील थेट खात्यात जमा होणार आहे.