मुंबई | नगर सहयाद्री:-
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थींना दरमहा १५०० रुपये राज्य सरकारकडून दिली जाते. मात्र, ऑगस्ट महिना संपण्यास अवघे काही दिवस उरले असतानाही हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, हप्ता पुन्हा लांबण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मागील काही महिन्यांपासून हप्त्याच्या अदा करण्यात सातत्याने उशीर होत आहे.जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला, तर सरकारकडून ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३००० दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी झालेली नसली तरी लाभार्थ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या २६ लाखांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सरकारकडून या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांचे आधार, उत्पन्न, नोकरी, कुटुंबाचे आर्थिक स्वरूप आदी निकष तपासत आहेत. अपात्र ठरलेल्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येणार असून, काही प्रकरणांमध्ये कारवाईची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.