युवक हतबल | एजंटांचा सुळसुळाट | अवाजवी मागणीमुळे होतेय आर्थिक लूट
विजय गोबरे / नगर सह्याद्री ः
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी झाले असले तरी अद्याप मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठ्या आर्थिक लुटीला सोमोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी प्रशासनाच्या दप्तरी आढळल्या आहेत. परंतु, त्या मिळवायच्या कशा, वंशावळ जुळवायची कशी, मोडीलीपीतील वंशावळ वाचायची कुठे, ते समजणार कसे यांसह अनेक प्रश्नांनी मराठा बांधव अनभिज्ञ आहेत. कुणबी नोंदी मिळूनही कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची दैना मराठा बांधवांची पाठ सोडायला तयार नसल्याचे समोर आले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रव्यापी लढा उभारला. मोठे आंदोलने झाले. अगदी दिल्लीतही या आंदोलनाची दखल घेतली असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या उपोषण, आंदोलने यामुळे शासनाने युद्धपातळीवर कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम राबवली. यासाठी शाळा, महाविद्यालये, महसूल विभाग कामाला लागला. यातून आजवर ३५ लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्याचे सांगितले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळतील व त्यांची पुढील वाट सोपी होईल, असे वाटत असतानाच आता एजंटगिरीने याला विळखा घातल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मराठा समाजाला कुणबी पुरावा शोधून देण्यासाठी व सर्टिफिकेट देण्यासाठी पैशांची मागणी होऊ लागली आहे. कुणबी नोंदी शोधणे, सर्टिफिकेट देणे आदी प्रक्रिया करण्यासाठी ५ हजार ते २५ हजार रुपयांची मागणी केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे शाळा, महसूल विभागातून कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्याची मागणी संबंधितांपर्यंत कशी पोहोचली नाही? किंवा या नोंदी सापडल्या आहेत, जी माहिती संकलित झाली आहे तिचे पुढे काय झाले? त्याची पुढील प्रक्रिया काय? हा देखील सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.
अहमदनगरमध्ये १० हजारांचा रेट?
अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी १० हजार रुपये मागितले जात असल्याचे काही नागरिकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. पाच हजार रुपये मोडी लिपीमधील नोंद शोधण्यासाठी व उर्वरित पाच हजार प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी मागितले जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच सध्या जी विविध स्तरावरून कुणबी नोंदी शोधल्याचे सांगितले जात आहे, तर ती माहिती कुठे उपलब्ध होईल याबाबत देखील त्यांना कसलीही कल्पना नसल्याचे समोर आले आहे.
कुणबीसाठी ५० हजार मागितल्याचाही आरोप
करमाळ्यामध्ये कुणबी मराठा दाखले काढण्यासाठी एजंट ५० हजार रुपये घेत असल्याचा आरोप एका मोठ्या पदाधिकार्याने केला होता. त्यांनी कुणबी मराठा दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट असून एक दाखला काढून देण्यासाठी ५० हजार घेतले जात असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य मीडियात चांगलेच व्हायरल झाले होते.
नोंद शोधायला ३, प्रमाणपत्रासाठी प्रतिव्यक्ती ३ हजार
कुणबी नोंदणी शोधण्यासाठी एजंटने तीन हजार रुपयांची मागणी केली. नोंद सापडल्यानंतर प्रमाणपत्रासाठी प्रतिव्यक्ती ३ हजारांची मागणी करण्यात आली. घरात मी धरून तीन व्यक्ती आहेत. त्यासाठी टोटल १२ हजारांची मागणी एजंटकडून करण्यात आली, अशी माहिती नगर तालुयातील एका व्यक्तीने दिली आहे.
- प्रमाणपत्र वाटपासाठी गावपातळीवर शिबिरे होतील : गोरख दळवी
मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा केलेला लढा यशस्वी झाला आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र वाटप गावपातळीवर शिबिरे राबवून द्यावीत, अशी आमची विनंती आहे. प्रशासनही त्याबाबत सकारात्मक आहे. कुणीही एजंटच्या फसवेगिरीला बळी पडू नये. प्रशासन काम करत आहे. सध्या फक्त सेतू कार्यालयांचे एजंट पैशांची मागणी करत असल्याचे कानावर येत आहे. असे काही प्रकार समोर आले तर त्या सेतुचालकाचे लायसन्स तहसीलदारांनी रद्द करावे. कुणीही प्रमाणपत्रासाठी पैसे देऊ नयेत. ज्यांना याद्या सापडल्या नाहीत किंवा प्रशासकीय पातळीवर अडचणी येत असतील तर मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करेन.
गोरख दळवी, मराठा सेवक, नगर.
- शिबिरे घेऊन प्रमाणपत्रे वाटणार : तहसीलदार संजय शिंदे
विविध स्तरावर कुणबी नोंदी शोधण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. हजारो कुणबी नोंदणी अहमदनगर जिल्ह्यात सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या तहसीलमध्ये आहेत. तसेच ऑनलाईन देखील टाकल्या आहेत. सगळा कारभार ऑनलाईन तसेच पारदर्शी असल्याने कुणीही एजंटांच्या खोट्या बोलण्याला फसू नये, असे आवाहन नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी केले आहे.
ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी तहसीलमध्ये याद्या पाहून ऑनलाईन अर्ज द्यायचा आहे. या याद्या ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच अल्पावधीतच शिबिरे घेऊन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना ही प्रमाणपत्रे शिबिरांमधून आपोआप पोहोच होतील. यासाठी कसल्याही अमिषाला बळी पडून, कुणालाही पैसे देऊ नका असे आवाहन तहसीलदार शिंदे यांनी केले आहे.