अहिल्यानगर | नगर सह्याद्री
बँकेच्या कर्मचारी आयडीचा वापर करुन कर्जदारांकडून पैसे जमा केले. परंतु ती रक्कम बँकेत जमा केलीच नाही. जमा झालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.
कोटक महिंद्रा बँक, नागापूर शाखेत 4 लाख 72 हजार 60 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संजय रघुनाथ भंडारे (वय 45, रा. प्लॉट नं. 51, नामगंगा रिसॉर्ट जवळ, सारसनगर, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून सुनिल दिलीप सोनटक्के (रा. चांदगाव रोड, सोनटक्के वस्ती, ता. पाथड, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
सुनिल सोनटक्के याने नोव्हेंबर 2023 पासून कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचारी आयडी 290200 चा वापर करून बँकेच्या विविध कर्जदारांकडून 4 लाख 72 हजार 60 रुपये जमा केले. मात्र, ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.
या फसवणुकीमुळे बँकेचा विश्वासघात झाल्याचा आरोप आहे. ही घटना 09 नोव्हेंबर 2023 पासून 07 ऑगस्ट 2025 पर्यंत नागापूर शाखेत घडली. फिर्यादी संजय भंडारे यांनी 07 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.