दिनेश आहेर नियंत्रण कक्षात | एसपी सोमनाथ घार्गे यांचे आदेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षपदी किरणकुमार कबाडी यांची तर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश काढले.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक २३ जुलै २०२५ रोजी पार पडली. या बैठकीत पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मध्यावधी बदल्या करण्यात आल्या असून, यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलिस निरीक्षक दिनेश विठ्ठलराव आहेर यांची स्थानिक गुन्हे शाखेतून नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली. तर पोलिस निरीक्षक किरणकुमार दशरथ कबाडी यांची नियंत्रण कक्षातून स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, बदली झालेल्या अधिकार्यांनी तात्काळ नव्या ठिकाणी हजर व्हावे आणि प्रभारी अधिकार्यांनी कार्यभार स्वीकारून अनुपालन अहवाल सादर करावा. सध्या स्थानिक गुन्हे शाखेत एक पोलिस निरीक्षक, तीन उपनिरीक्षक आणि ५८ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १२ कर्मचारी स्थानिक गुन्हे आणि विशेष शाखेत, तर १७ कर्मचारी विविध पोलिस स्टेशनमधून संलग्न म्हणून काम करत आहेत. सायबर विभागातील काही कर्मचारीही स्थानिक गुन्हे शाखेत तपासाचे काम पाहत आहेत. नव्याने नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडे संलग्न कर्मचार्यांच्या बदल्यांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.