अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. येथील सबजेल कारागृहात जागा नसल्यामुळे त्यांना नाशिकला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
विवाहितेवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यांना मंगळवारी (दि. २२) पहाटे अटक करण्यात आली. ते पोलिस कोठडीत होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. के. पाटील यांनी न्यायालयीन कोठडी दिली. काळे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.