मुंबई । नगर सहयाद्री: –
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स आज (२ डिसेंबर २०२४) संपणार आहे. सोमवारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, हे निश्चित होईल, त्या निवडीला आमच्या पक्षाचा बिनशर्त पाठिंबा असेल, असे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असून भाजपने फायनल केल्याचं समोर आलेय. आज यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होणार आहे. मंगळवारी भाजप आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीतच देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस हे भाजपातील किंगमेकर असून त्यांचा प्रशासनातील अनुभव मोठा आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी रविवारी सांगितले. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्यांच्या निवडीसाठी दोन अथवा तीन डिसेंबर रोजी आमदारांची बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.