राजे, आमच्या दावणीचा मालक बदललाय हो! राजे, हा मालक शोधा! राजे, होय तुम्हीच शोधा!
सारिपाट / शिवाजी शिर्के:-
राजे जयंतीच्या निमित्ताने आम्ही ऊर बडवला तुमच्या नावानं! तुमच्या धाडसाचं कौतुक करणारे पोवाडे जसे वाजवले तसेच आम्ही वाजवले ते कानफाटेस्तोवर डीजेची गाणी! आयाबहिणींचा सन्मान करणारे, त्यांची ओटी भरवून त्यांची सन्मानाने पाठवणी करणारे तुम्हीच! आम्ही त्यांच्याच समोर हिडीस गाणे लावत डीजेच्या तालावर मरेस्तोवर दारु ढोसली अन् चक्कर येऊन पडेस्तोवर नाचलो! राजे, झिंगाट झालो हो आम्ही! काय करणार! आमच्या साहेबांना, दादांना, भाईला नगरसेवक पदाचे वेध लागलेत! हिंदू हिताचा नेता नक्की कोण हे दाखविण्याची स्पर्धा आमच्या नगरमध्ये सुरू झालीय! हिंदू हित की बात कोण करतेय आणि कोण हिंदूंचा कैवार घेतोय या स्पर्धेत कालच्या तुमच्या जयंतीच्या मिरवणुकीत आम्हाला दारु पिण्यास मोक्कार मोकळीक दिली होती हो. काय करणार! तुमच्या जयंतीच्या निमित्ताने शासनाने दारु दुकाने बंद ठेवली होती. परमीट रुम बंद ठेवले होते. पण, राजे आम्हाला ती अवदसा नुसती भेटलीच नाही तर जीव जावोस्तोवर ढोसायला भेटली! राजे लई झिंगलो हो आम्ही तुमच्या मिरवणुकीत! राजे, तुम्हाला रयतेचं राज्य अभिप्रेत होतं आणि तुम्ही त्यासाठी प्राणपणाने लढा दिला! राजे आम्ही तुमच्या मिरवणुकीत बिष्णोईचे फोटो घेऊन नाचलो. राजे, आम्हाला आज समजलं की तो बिष्णोई गँगस्टर आहे! राजे, आज आमच्यातील काहींचे कान सुन्न झालेत! लई आव्वाज होता हो काल त्या डिजेचा! राजे, तुमचे कान शाबूत आहेत ना! राजे, जरा चुकलंच आमचं! आम्हाला माफ करा इतकंच!
राजे, तुमच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या नगर शहरातून बुधवारी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकत्यांनी राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फलक झळकावला. याच फलकावर पाठीमागील बाजूस भाजप नेते, मंत्री नितेश राणेंचाही फोटो होता. डीजेच्या तालावर नाचताना कार्यकर्त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर, नथुराम गोडसे यांच्यासह मंत्री नितेश राणे व कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावले. बिश्नोईच्या फलकावर ’आय ॲम ए हिंदू ए मॅड ए मॅड’ असे लिहिले होते. राजे, आज सकाळी आम्ही भानावर आलो अन् आमच्या हातून जरा चूकच झाली असं आम्हाला वाटू लागलंय! राजे आम्हाला माफ करा!
पाटोद्याचे मित्रवर्य कवी सुर्यकांत डोळसे यांची आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी कविता आज आमच्या वाचन्यात आली आणि आमचे डोळे खाडकन उघडले. राजे, सुर्यकात डोळसे म्हणतो, राजे खरं सांगू, तुमच्या कल्पनेतलं रयतेचं राज्य दूर दूर कुठं दिसत नाही कारण आराध्य दैवत सतत मनात, डोक्यात व आचरणात ठेवुन मिरविणे गरजेचे असताना केवळ डोक्यावर घेवुन नाचणारेच जास्त झाली आहेत. राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…. राजे असा कंटाळा करून चालणार नाही, माझ्याशिवाय तुमच्याशी, खरे कुणीच बोलणार नाही. राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शिवबा घडवायचा असेल तर त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे. शहाजीच्या मनामध्ये ही आस ठसली पाहिजे. पण आजकाल हे सारे घडताना दिसत नाही.
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते पण पचनी पडताना दिसत नाही. आधी लगीन कोंढाण्याचे म्हणण्याची आज तानाजीत हिंमत नाही, बापजाद्यांच्या पराक्रमांची आज रायबाला किंमत नाही. आपलेच आपल्याला लुटायला लागले, परक्यांची आवश्यकता नाही. परक्यांनीच लुटले पाहिजे, हा काही त्यांचाच मक्ता नाही. सुखी माणूस तोच, ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे. तो बघा ज्याचा प्रदेश, तिथेच त्याचा किल्ला व झेंडा आहे. फुरफुरणारे ते राजकीय घोडे, जमेल तसे उधळत आहे. कुणी वाजतोय टाळ्या, कुणी मोठ्याने खिदळत आहे. खूप झाल्या सेना, खूप झाले सेनापती, सैनिका-सैनिकांची वाटणी आहे. वाईट वाटण्याचे कारण नाही, आजच्या राजकारणाची हीच धाटणी आहे. निष्ठा दाखवायची खुमखुमी येता पटकन डिजिटल बॅनर डकवतो. राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शेतकऱ्यांची अवस्था अशी की, जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे. बारा महिने तेरा त्रिकाळ त्यांच्या आयुष़्यात उन्हाळा आहे.
राजे, चूकुनही बघू नका, त्यांची अवस्था कशी आहे? विषासाठी पैसा नसेल तर घराच्या आढ्याला फाशी आहे. सरकार म्हणाले शिका, पोरं इथले शिकले आहेत. शिक्षणाची दुकाने तर वढ्या-वघळीला टाकले आहेत. जसे राजकारणाचे, तसेच आमचेही झाले आहे, स्वाहाकाराला बकासुरी रूप आले आहे. आया-बहिणींच्या इज्ज्तीची समस्या तर जटील आहे. नाक्या-नाक्यावर उभा जणू रांझ्याचा पाटील आहे. ज्याला त्याला आपली भूमिका, जबाबदारीने वठवावी लागेल. जर चुकून गेलाच तोल तर, सुभेदाराची सून आठवावी लागेल. आमच्यापैकी अनेक जण तुमची शिकवण आचरणात न आणता, तुमच्यासारखी करून वेशभूषा, झेंडा गाड्यांवर लावून बेफाम पणे उधळत आहेत, मद्यप्राशन करत डीजेवर उन्मादपणे थिरकत आहेत. राजे,यांना बावळे समजू नका, हे तर खरे शहाणे आहेत. तुम्हाला केलेय देव त्यांनी, तुमची इथे देवळे आहेत. राजे खरं सांगू, तुमच्या कल्पनेतलं रयतेचं राज्य दूर दूर कुठं दिसत नाही.
सूर्यकांत डोळस या मित्राने विडंबन करत जे काही लिहीलंय त्यात गैर काहीच वाटायला तयार नाही. राजे खरं सांगू का, कालच्याला तीन-चार पेग मीही जास्तच मारले हो! पण, आज ती झिंग उतरल्यावर मलाही उमजलंय की माझी काल किती मोठी चूक झालीय! राजे, काल ड्राय डे होताना! अहो राजे संपूर्ण दिवस आणि रात्रभर दारू विकली गेली! सांगा राजे असला ड्राय डे काय कामाचा!
हिंदुत्वाची लढाई नक्की खेळते कोण ही स्पर्धा नगर मध्ये सुरू झाली आहे! ही सारी थेरं आणि नाटकं आहेत! राजे, हे मला उमगलं पण, कालच्याला मीही जरा चुकलोच बरं! राजे नगर मधील सर्व प्रशासन नक्की कोणाच्या दावणीला बांधले आहे हो? दावन तीच आहे, राजे दावणीचा मालक बदललाय. राजे हा मालक शोधा! राजे होय तुम्हीच शोधा! कारण आम्हाला छत्रपती हवेत परंतु शेजारच्या घरात. राजे समजते ना तुम्हाला. राजे काळजी घ्या. आमचीही आणि तुमची. राजे, तुम्ही जन्माला याच पण शेजारच्या घरात! राजे, कालच्याला आम्ही चुकलो! पुन्हा चुकणार नाही हे ठाम विश्वासानं नाही सांगू शकत आम्ही! पण, राजे आम्हाला (जमलं तर) माफ करा इतकंच!