अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
‘मुळशी पॅटर्न’ मराठी सिनेमाप्रमाणे केडगाव येथील ‘रावण टोळी’ नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होती. टोळितील सदस्यांनी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला होता. या टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. त्यांची पोलिसांनी त्याच परिसरातून धींड देखील काढली. स्थानिक रहिवाशांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना रस्त्यावर उतरवले होते.
केडगाव उपनगरात 14 एप्रिल रोजी सामूहिक अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने (वय 16) गुरूवारी (17 एप्रिल) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार रावण टोळीचा मोरक्या मयुर अनिल आगे, अबुजर राजे (पूर्ण नाव माहिती नाही), शाहरूख अन्सार पठाण, आदित्य प्रशांत सोनवणे, अजय किशोर शिंदे, ओमकार उर्फ भैया राहिंज, रोहित पांडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते, रोहित कोल्हे, अतिफ शेख, सौरभ गायकवाड (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. केडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
14 एप्रिल रोजी रात्री केडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक संपल्यानंतर फिर्यादी मुलगा केडगाव येथील मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेला. तेथे झोपलेला असता रात्री 11:30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी दरवाजा तोडून घरात घुसून त्यास व त्याच्या मित्राच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर त्यास जबरदस्तीने रस्त्यावर ओढून ओढून नेण्यात आले.
आरोपींनी त्याला स्कॉर्पिओ वाहनमध्ये जबरदस्तीने बसवून, त्याचे कपडे काढायला लावले, व्हिडीओ शुटिंग करून त्याचा लैंगिक छळ केला. तसेच अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप देखील टोळी विरोधात करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी रावण टोळीतील 12 सदस्यांना अवघ्या काही दिवसात गजाआड केले. तसेच दहशत माजवणाऱ्या रावण टोळीतील आरोपीची पोलिसांनी त्याच ठिकाणाहून वरात काढली. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंठकांवर पोलिसांच्या व कायद्याच्या भीतीचे सावट पसरले.
कोणी दहशत करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा: अमोल भारती
14 एप्रिल रोजी रावण साम्राज्य ग्रुप टोळीतील सदस्यांनी 16 वषय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा केला होता. आरोपी रावण टोळीच्या माध्यमातून परिसरात दहशत पसरवत होते. या टोळीतील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. यापुढे रावण टोळीच्या नावाने कोणी दहशत करत असेल तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन डीवायएसपी अमोल भरती यांनी केले आहे.