खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला नगर जिल्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 60 वषय शांताबाई निकोले या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. बुधवारी (12 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी कुटुंबातील व्यक्तींच्या डोळ्यादेखत बिबट्याने पाच वषय चिमुरडीला उचलून नेले. या घटनेमुळे पुन्हा नगर जिल्हा हादरला आहे.

रियांका सुनील पवार असे त्या मुलीचे नाव असून रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्याचे काम सुरु होते. अखेर 16 तासानंतर गुरुवारी (13 नोव्हेंबर) रोजी काटवणात मुलीचा मृतदेह सापडला आहे. खारे कर्जुने परिसरातील सुनील पवार यांचे कुटुंब शेतात काम संपवून वस्तीवर शेकोटीजवळ बसले होते. पाच वषय रियांका शेकोटीपासून थोड्याच अंतरावर खेळत होती. अचानक शेजारी असलेल्या तुरीच्या शेतातून बिबट्या बाहेर आला आणि रियांकाला उचलून नेल्याची घटना क्षणांत घडली.
चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानंतर कटूंबासह ग्रामस्थांनी आक्रोश केला. गावबंद अंदोलन करत नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासोबत परिसरातील इतर बिबटेही जेरबंद करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. वनविभागात कशा पद्धतीने पुढील कार्य करणार आणि किती दिवसात बिबट्या ठार किंवा जेरबंद होणार त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; अंत्यविधी रोखला
गुरुवारी सकाळी सोळा तासानंतर रियांकाचा मृतदेह सापडताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी एकत्र येत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत हा नरभक्षक बिबट्या ठार केला जात नाही, तोपर्यंत रियांकाच्या मृतदेहावर अंत्यविधी करणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. गावातील मराठी शाळा आणि माध्यमिक विद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. वनविभागाची टीम गावात ठाण मांडून असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आई समोरून बिबट्याने मुलीला उचलले
अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे घरासमोर अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुरडीला आई समोरून बिबट्याने उचलून नेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत चिमुरडीचा शोध सुरू होता. परंतु ती सापडली नाही. 16 तासानंतर काटवणात तिचा मृतदेह सापडला. यावेळी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी टाहो फोटला.
वन विभागाचा हलगजपणा भोवला
खारे कर्जुने परिसरात दिवाळीच्या अगोरदच बिबट्याचा वावर होता. शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याने वन विभागाकडे पिंजरा बसविण्याची माणगी केली जात होती. वन विभागाने गावात पिंजरा आणलाही होता. मात्र, त्याच्या गजांना वेल्डिंग करावयाची असल्याने गावात ठेवला होता. त्यात बुधवारी सायंकाळी बिबट्याने चिमुरडीचा जीव घेतला अन् वन विभागाचा पिंजरा गावातच राहिला. वन विभागाच्या हलगजपणामुळे चिमुकलीचा जीव गेला असल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांनी दिली.

कर्जुनेखारे येथे बिबट्याचा अल्पवयीन मुलीवर हल्ला
नागरिकांनी सतर्कता बाळगावी: आमदार काशिनाथ दाते
नगर तालुक्यातील मौजे कर्जुनेखारे येथे बुधवार दि. 12 नोहेंबर 2025 बिबट्याच्या हल्ल्यात सहा वषय रियंका सुनील पवार या अल्पवयीन मुलीला उचलून नेल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याचे समजताच पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा 11 वाजता स्वतः उपस्थित राहून त्यांनी पीडित कुटुंबीयांना धीर दिला तसेच घटनास्थळाची पाहणी केली.
या प्रसंगी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलारे, कैलास लांडे, जन्माहद सय्यद, सरपंच प्रभाकर मगर, रोहीदास गायकवाड, मारुती बढेकर, तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे निदर्शनास आल्याने यावेळी आमदार दाते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या सापडेपर्यंत गाव न सोडण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच, हा बिबट्या आता नरभक्षक स्वरूपाचा झालेला असल्याने त्याला तातडीने पकडण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आपली व आपापल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याविषयी स्थानिक ग्रामस्थांना जागरूक केले. आमदार दाते यांनी नागरिकांना आवाहन केले की, परिस्थिती कसलीही असुद्या, प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा एक लोकप्रतिनिधी म्हणुन, आपल्या कुटुंबातील घटक म्हणुन मी कायम आपल्या सोबत आहे, प्रशासन आपले काम करेल, त्यांना परिस्थितीचे गांभिर्य ओळखून सर्वांनी सहकार्य करावे. एकदा गेलेला जीव परत आणता येत नाही. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणुन आपण आपली व आपल्या कुटुंबियांसह इतरांचीही काळजी घेतली पाहिजे. गावातील नागरिकांनी रात्री बाहेर जाताना खबरदारी घ्यावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागास माहिती द्यावी.

अहिल्यानगर तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करावा; पिडीत कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळावी
नगर तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच खारेकर्जुने येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी या मागणीचे निवेदन पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यानी तहसीलदार संजय शिंदे यांना दिले.सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत आहे. हिंगणगाव, खातगाव, खारेकर्जुने, टाकळी, निमगाव, हमिदपुर अशा परिसरातील गावांमध्ये फिरत आहे. बुधवारी खारेकर्जने येथे दुर्दवी घटना घडली आहे. या सर्व परिसरात कामगार वर्ग, विदयाथ, शेतकरी वर्ग भीतीदायक परिस्थीतीत आहेत. परिसरात अनेक शाळा तसेत महाविदयालये असून विदयार्थाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभाग दुर्लक्ष करत असून त्यांची यंत्रणा अपुरी पडत आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी तात्काळ सर्व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावून बंदोबस्त करावा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. पीडीत कुटुंबियांना शासनाकडुन तातडीची मदत मिळावी. यावेळी जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समिती उपाध्यक्ष प्रताप शेळके, पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर, बि.डी. कोतकर सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गुंडेगावच्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचे थैमान
अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात 851 हेक्टरवर पसरलेले घनदाट वनक्षेत्र आता गावकऱ्यांसाठी संकट बनले आहे. वन्यप्राण्यांचा धुमाकुळ दिवसेंदिवस वाढत असून, रानडुक्कर, हरीण आणि बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रानडुकरांच्या टोळ्या रात्रीच्या सुमारास शेतात घुसून उस, मका, हरभरा, आणि भाजीपाला पूर्णपणे उद्ध्वस्त करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पिके नष्ट होताना पाहिली आहेत. गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही वन अधिकारी घटनास्थळी फिरकलेले नाहीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, पण वन विभाग झोपला आहे. आम्ही रोज जीव मुठीत घेऊन शेतात जातो. बिबट्याच्या भीतीने रात्री कुणालाही बाहेर पडायची हिम्मत होत नाही, असे शेतकरी महादेव चौधरी यांनी संतापाने सांगितले. गुंडेगाव परीसरातील चौधरवाडी, धावडे वाडी, कुताळमळा, वाघदरा, भापकरवस्ती, कोळगाव खिंड या परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काही ठिकाणी कुत्रे, शेळ्या फाडून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीही वन विभागाचा अधिकारी, कर्मचारी आणि पथक कुठेच दिसत नाही. गावकऱ्यांनी थेट प्रश्न विचारला आहे. गुंडेगावचे वन अधिकारी नेमके आहेत तरी कोठे? ड्युटीवर आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांचा संताप उफाळला आहे. वन विभागाने तातडीने पुढील उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वनक्षेत्रात पथक नेमावे. सापळे व प्रकाश व्यवस्था करावी. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. जर पुढील काही दिवसांत उपाय झाले नाहीत, तर शेतकरी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
वन विभागाने जबाबदारी घ्यावी
गुंडेगाव सारख्या मोठ्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव हा केवळ निसर्गाचा नव्हे, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार नाही. वन विभागाने जबाबदारी घेतलीच पाहिजे, अन्यथा लोकांचा रोष उफाळणार हे निश्चित.
संजय भापकर , ग्रांमस्थ गुंडेगाव



