पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुका सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने जोरदार विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 15 पैकी तब्बल 12 जागांवर त्यांच्या गटाने बाजी मारली आहे. या निवडणुकीत डॉ. विखे यांनी प्रत्यक्ष सहभाग न घेता पडद्याआडून सर्व सुत्रे फिरवली आणि खा. लंके यांच्या विरोधकांची मोट विधानसभेप्रमाणेच बांधली. त्यात यश येऊन बारा जागांवर दणदणीत विजय मिळवत गुुलाल घेतला.
खासदार नीलेश लंके यांच्या सहकार पॅनलशी थेट मुकाबला करताना विद्यमान आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले. परिणामी चुरशीच्या लढतीत विखे गटाने स्पष्ट आघाडी घेतली होती. लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरचा राजकीय पट पूर्णपणे बदलला. ज्या-ज्या ठिकाणी निलेश लंके यांचे वर्चस्व होते, तिथे-तिथे विजयाची पताका डॉ. विखेंच्या समर्थकांनी फडकवली. मग ती आमदारकीची निवडणूक असो किंवा विविध संस्थांच्या कारभारातील सत्ता असो, प्रत्येक ठिकाणी लंकेंना पराभवाची चव चाखावी लागली.
सुजय विखे समर्थक विजयी उमेदवार
सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा विकास मंडळाचे विजयी उमेदवार- सविता औटी 41, उत्तम भालेकर 41, कल्याण काळे 42, मारुती मुंंगसे 40, दत्ता पवार 45, संदीप ठुबे 43, दादाभाऊ वारे 48, किसन गवळी 45, निर्मला भालेकर 41, युवराज पठारे 51, भीमराव शिंदे 46, राजेंद्र पाचरणे 44.
खा. निलेश लंके समर्थक विजयी उमेदवार
खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंडळाचे विजयी उमेदवार- अनिकेत पठारे 47, संतोष गांगड 39, पूनम मंगसे 43.
दूध संघाला गतवैभव प्राप्त होणार!
पारनेर तालुका दूध संघ मागील 10 वर्षे बंद होता. चार वर्षांपूव पुन्हा सुरू झाल्यानंतर सध्या दररोज 6,000 लिटर दूध संकलन सुरू आहे, तर पूव हे प्रमाण 70,000 लिटर होते. सुजय विखे पाटील यांनी संघाचा कारभार पुन्हा शेतकरी व संचालकांच्या हाती देऊन, त्याला गतवैभव परत मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
खा. लंके यांच्या वर्चस्वाला तालुक्यात उतरती कळा!
कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्याच दमात आमदार, लागलीच खासदारकी मिळाल्यानंतर निलेश लंके व त्यांचे समर्थक हवेत उडू लागले. सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार झाले आणि त्यातूनच विधानसभा निवडणुकीत राणी लंके यांना पराभूत करण्यास गावागावातील सामान्य मतदार संघटीत झाले. विधानसभा निवडणुकीपासूनच खा. लंके यांच्या तालुक्यातील राजकीय वर्चस्वाला उतरती कळा लागली असल्याचे अनेकदा दिसून आले. आता दूध संघाच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.