लिंक रोड परिसरातील सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व वृक्षारोपण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
केडगाव हे शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे. पुणे महामार्ग ते कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या लिंक रोडचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरील जुना दगडी पुल काढून आरसीसी पुलाचे काम माग लावले आहे. पथदिवेही बसविण्यात येणार आहेत. आता महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने आता इच्छुक तुमच्याकडे येत आहेत. जे पाण्याचे कनेक्शन देऊ शकत नाही ते सांगतात आम्ही कामे केली आहे. आता ही निवडणूक पाणी, गटार, स्वच्छता, आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी होणार आहे. आता सर्वांनी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे.
जे एल पी रेसिडेन्सी भागातील नागरिकांनी एकत्रित येऊन सांस्कृतिक भवनाचे काम सुरू केले आहे. तसेच वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले जावे. हाती घेतलेला उपक्रम लोक चळवळ म्हणून पुढे घेऊन जावा, केडगाव परिसराला विकास कामाच्या माध्यमातून नवी दिशा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. केडगाव जे एल पी रेसिडेन्सी लिंक रोड परिसरातील ओपन स्पेसमधील सांस्कृतिक भवन कामाचे भूमिपूजन व वृक्षारोपण संपन्न झाले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, विशाल पवार, राजेंद्र शिंदे, उद्योजक दिलीप दहिफळे, कृष्णा लांडे, जालिंदर पालवे, शिवाजी नाईकवाडे, आप्पासाहेब गागरे, संदीप भोर, मेजर वसंत वाव्हळ, सुरेश नन्नवरे, सचिन म्हस्के, दिलीप गांधी, सुनील कांबळे, संभाजी पवार, उषा नाईकवाडी, मंदा ननवरे, उमादेवी राऊत, अनिता ढाकणे, अश्विनी म्हस्के, ज्योती जाधव, दिलीप कपिले, कारभारी सांगळे, अनिल जाधव, नागनाथ घोडके, सावळेराम पुंड आदीसह रहिवासी उपस्थित होते.
दिलीप दहिफळे म्हणाले की, केडगाव जे एल पी रेसिडेन्सी लिंक रोड परिसरातील विविध विकासाची कामे आमदार संग्राम जगताप यांनी माग लावले आहे. नागरिकांनी एकत्रित येऊन सांस्कृतिक भवन उभे करण्याचे काम सुरू केले आहे. केडगाव औद्योगिक वसाहत मधून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाणार आहे. या परिसरातील लाईट, पिण्याचे पाणी, घंटागाडी तसेच सांस्कृतिक भवनाला संरक्षण भिंतीचे काम माग लावण्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले.