गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे अडसूळ यांनी राजीनामा दिल्यानंतर 11 नगरसेवकांना राजकीय सहलीवर पाठवले असताना, आता सर्वांचे लक्ष महाविकास आघाडी आणि विशेषत: खासदार नीलेश लंके यांच्या भूमिकेकडे लागले आहे. नगराध्यक्षपद निवडीत आता महाविकास आघाडीचा ’धर्म’ पाळला जाणार का? नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
खासदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवाराला संधी द्यावी, अशी चर्चा आहे. यात प्रामुख्याने राजू शेख यांच्या पत्नी उपनगराध्यक्षा जायदा शेख आणि सामाजिक कार्यकर्ते शिवसेना नेते ऋषिकेश गंधाडे यांच्या मातोश्री नगरसेविका विद्याताई गंधाडे यांची नावे आघाडीवर आहेत. जर महाविकास आघाडीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, तर या दोन्ही महिला नगरसेविकांपैकी एकाला नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळू शकते.
विद्यमान उपनगराध्यक्षा जायदा शेख आणि ज्येष्ठ नगरसेविका विद्याताई गंधाडे महाविकास आघाडीच्या संभावित उमेदवारांबरोबरच नगराध्यक्षपदासाठी योगेश मते, सुप्रिया शिंदे, आणि डॉ. विद्या कावरे यांची नावेही चर्चेत आहेत. यापैकी कोण बाजी मारणार आणि त्याला महाविकास आघाडीतील कोणत्या गटाचा पाठिंबा मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यापूव झालेल्या राजकीय उलथापालथी लक्षात घेता, दोन्ही आघाड्यांकडून ’गुपचूप’ हालचाली सुरू असण्याची शक्यता आहे. नितीन अडसूळ यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुढील काही दिवसांत नामांकन प्रक्रिया आणि प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. 11 नगरसेवकांना सहलीवर पाठवल्यामुळे निवडणुकीच्यावेळी ते कोणाला मतदान करतात, यावर सर्व समीकरणे अवलंबून असतील. खासदार नीलेश लंके हे महाविकास आघाडीतील आपल्या मित्रपक्षाला संधी देतात की, स्वतःच्या गटातील नगरसेवकाला पुढे करतात, तसेच महायुती काय भूमिका घेते, यावर पारनेर नगरपंचायतीचे पुढील नेतृत्व कोण करणार, हे स्पष्ट होईल.
महायुतीची ’वेगळी खेळी’?
केवळ महाविकास आघाडीतच नाही, तर महायुतीच्या गोटातही हालचाली सुरू आहेत. भाजप नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी काहीतरी वेगळी राजकीय खेळी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद किंवा नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतो. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतविभागणी झाल्यास, महायुती ’वेट अँड वॉच’ ची भूमिका घेत आपला उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल.



 
                                    
