कोरोना काळासह त्यानंतर दूध अनुदानाबाबत का बोलले नाही अन् अनुदान का दिले नाही? दूधभावाचा पुळका दाखवू नका! / आमच्या सरकारने अनुदानासह ३५ रुपये भाव देखील दिल्याचा शिवाजीराव कर्डिले यांचा दावा
राहुरी | नगर सह्याद्री
निवडणूक आली असताना जनतेचा कळवळा दाखविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र, दूधाच्या अनुदानासाठी त्यांनी कधीच तोंड उघडले नाही. ही मागणी आमदार नसतानाही मी केली आणि विखे पाटलांच्या माध्यमातून मार्गी लावली. राज्यात ते मंत्री होते आणि त्यांचेच सरकार होते. त्यावेळी दुधाला २२ रुपये भाव असतानाही दुधासाठी अनुदान त्यांनी दिले नाही आणि ते मिळावे यासाठी तनपुरेंनी तोंड उघडले नाही. कोरोनासारख्या महामारीत अनेकांना अडचणी आल्या. अनेकांचे जीव गेले. त्यावेळी त्यांनी इंजेक्शनचा बाजार मांडला. याच कालावधीत दुधाचा भाव १७ रुपयांवर आला. त्यावेळीही यांनी तोंड उघडले नाही आणि अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाही. दूध उत्पादकांना त्यावेळी एक रुपयाचेही अनुदान देणार्यांनी आता या विषयावर पुळका असल्याचे मिरवू नये. त्यांचे हे पुतणामावशीचे प्रेम जनतेने ओळखले असून त्यांना याची किंमत मतदानातून मोजावी लागेल. दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी केली. त्यातूनच आमच्या सरकारने अनुदानासह ३५ रुपयांचा भाव देण्याचे काम केले असल्याचा दावाही कर्डिले यांनी केला.
लाडक्या बहिणीच्या जोडीने दूधाचे
अनुदान देखील चालूच राहणार!
कोरोना सारख्या महामारीत शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम केले. जिल्हा बँकेकडून कोरोना कालावधीत शेतकर्यांना खेळते भांडवल दिल्याने मोठा आधार मिळाला. गेल्या सात महिन्यांपासून शेतकर्यांना दूध अनुदान देण्याची प्रक्रिया चालू आहे. लाडक्या बहिणीला प्रति महिना मिळणारी दीड हजार रुपयांची आमच्या सरकारची भेट यापुढेही चालूच राहणार नाही. आता या लाडक्या बहिणींच्या गोठ्यातील जनावरांच्या दुधाला दर महिन्याला मिळणारे अनुदान देखील कायमस्वरुपी चालूच राहणार आहे. अनुदान बंद होणार असल्याचा अपप्रचार करणार्यांना हे अनुदान बंद करायचे असल्याने त्यांना रोखा असे आवाहनही कर्डिले यांनी केले.
मंत्री होऊनही राहुरीकर
तुम्हाला का वैतागले?
दहशत, गुंडगिरी याबद्दल माझ्यावर आरोप करणार्यांची राहुरीकरांवर किती दहशत आहे हे दररोज तेथील जनता अनुभवत आहे. त्यांच्या वाड्याच्या भिंतीजवळ कोणी कचरा टाकला तरी त्याला ‘पाहून घेऊ का?’, अशी धमकी देणार्या तनपुरे कुटुंबाचा खरा चेहरा राहुरीकरांनी ओळखला आहे. त्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. मंत्री म्हणून काम केले असतानाही तुम्हाला राहुरीकर का वैतागले असल्याचेही कर्डिले यांनी निदर्शनास आणून दिले.
मामाकडून मिळालेला लाल दिवा
जनतेवर दहशतीसाठी वापरला!
गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील अनेक प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत. दूधाला अनुदान मिळावे यासाठीची बोटभर मागणी न करणार्यांनी लाल दिवा कोणासाठी वापरला असा सवाल कर्डिले यांनी उपस्थित केला. मामाच्या जिवावर लाल दिवा मिळाला असताना त्या दिव्याचे अप्रुप जनतेला कधीच वाटले नाही. कारण हा दिवा त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठीच त्यांनी जास्त प्रमाणात वापरला.
माझी साधी प्रचार पत्रक देखील
राहुरीत वाटू दिली जात नाहीत!
दहशतीच्या मुद्यावर खरे तर त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विरोध वाढत चालला आहे. कोणीही त्यांच्यासोबत राहायला तयार नाही. ते एकटे पडले आहेत. बारागाव नांदूरसह राहुरीतील अनेक गावांमध्ये त्यांना विरोध होऊ लागला आहे. राहुरी तालुक्यात माझी प्रचार पत्रके वाटणार्या आणि मतदारांना भेटणार्या कार्यकर्त्यांना ते स्वत: आणि त्यांचे पंटर धमकावत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचेच हे प्रतिक आहे. माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना ते जेव्हढा विरोध करतील तेव्हढे माझे मताधिक्य वाढलेले असेल असा विश्वासही कर्डिले यांनी व्यक्त केला.
वडिलांनी धमकावल्याने त्यांची
दहशत अधोरेखीत झाली!
आम्ही प्रेमाने जनतेला जिंकतो असे सांगणार्यांच्या वडिलांनी आम्हाला समर्थन देणार्या अण्णा बाचकर यांना फोनवर धमकी देऊन धमकावले. त्यांची ती पाहून घेण्याची आणि तनपुरे आता कोणालाही सोडणार नाहीत, ही भाषा प्रेमाची आहे का? आमच्यावर आरोप करणार्यांनी त्यांच्या वडिलांची ही भाषा कोणती हे आधी सांगावे. खरेतर सत्य समोर येतेच. वडिलांच्या त्या कृतीतून त्यांच्या दहशतीचा चेहरा समोर आला इतकेच, असा टोलाही त्यांनी लगावला.
वांबोरीसह तिसगावच्या पाणीप्रश्नी विश्वासघात!
वांबोरी चारीचे पाणी, तिसगावचा पाणी प्रश्न यासंदर्भात त्यांनी शब्द दिला होता. पाच वर्षात त्याचे काय झाले? तिसगाव परिसरातील जनतेचा त्यांनी विश्वासघात केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात गँगवार निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. गावागावात त्यांची दहशत निर्माण झाली असून व्यावसायिकांना मुठीत जीव धरुन व्यवसाय करावे लागत आहेत. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. त्यांची हीच दशहत मोडीत काढण्यासाठी आणि व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचेही कर्डिले यांनी सांगितले.
सुपा एमआयडीसीतील उद्योग
लंकेंच्या गुंडगिरीने बाहेर गेले!
माझ्यावर गुंडगिरी, दहशतीचा आरोप करणार्या आणि अपघाताने खासदार झालेल्या निलेश लंके यांनी जरा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अवघ्या पाच वर्षात तुमच्या विरोधात पारनेरमधूून नाराजी का वाढली? सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत कोणाची? तेथील किती उद्योग तुमच्या दहशतीने बाहेर गेले? तरुणांना रोजगार देण्याची, नवीन उद्योग आणण्यासाठी काडीमात्र प्रयत्न न करता आहे ते उद्योग बाहेर निघून जाण्याचे खरे पातक याच निलेश लंके यांचे आहे. अपघाताने खासदारकी मिळाली असली तरी आता आमदारकी मिळणार नाही असा चिमटा शिवाजीराव कर्डिले यांनी काढला. पारनेरमध्ये यावेळी डिपॉझीट राहते का याची काळजी करा, मगच आमच्याकडे या असा टोला लगावतानाच आपले कारनामे सांगण्याची वेळ आणू नका असा गर्भित इशाराही कर्डिले यांनी लंके यांना दिला.
गायीचा विमा सरकारकडून उतरविणार!
मतदारसंघातील जनतेला दुध व्यवसायाचा मोठा आधार आहे. मी देखील दूध उत्पादक शेतकरी आहे. दूधवाला आमदार म्हणून आजही माझी ओळख आहे. त्यामुळेच २०१८ मध्ये महायुतीच्या सरकारने शेतकर्यांना पाच रुपये अनुदान दिले होते. आता आता गायांची पूर्ण टॅगिंग केली असून त्यांची गणना देखील केली आहे. टॅगिंग केल्याने आता कधीही दुष्काळ पडला तरी त्यासाठी चार्याचे योग्य नियोजन करता येईल. गायीला सरकारतर्फे विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडणार आहे.