सुपा । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील करण दादाभाऊ ठुबे याने नॅशनल एलिजिबिलिटी कम अँड एंट्रन्स टेस्ट (नीट २०२५) घवघवीत यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत ५१५ गुण मिळाले आहेत. कोणत्याही खाजगी कोचिंग शिवाय फक्त पारनेर येथील शाळेत शिक्षण घेऊन हे यश मिळाल्याबद्दल पारनेर पब्लिक स्कूलचे संस्थापक गीताराम म्हस्के यांनी करणचे कौतुक केले आहे. करणने आतापर्यंत पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे. दहावीत त्याने ९४ टक्के गुण प्राप्त केले होते.
नुकत्याच झालेल्या एमएचटी-सीइटी (पी सी बी) मध्ये त्याने ९९.६९ इतके उच्चांकी गुण प्राप्त करून पारनेर पब्लिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच झालेल्या आयसर परीक्षेत त्याने कॅटेगरीतील ऑल इंडिया रँक २७२० पटकावला. मागील दोन वर्षांपूर्वी करणची मोठी बहीण दिव्या ठुबे हिने ६०३ गुण नीट परीक्षेत मिळवले होते. ती सध्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे एमबीबीएस करत आहे. ठुबे परिवारातील भावंडांच्या या यशामध्ये आजी मंगल हौसराव ठुबे यांचा खूप मोठा वाटा आहे असे करणचे वडील डॉ. दादाभाऊ ठुबे यांनी सांगितले.
बाबुर्डी ते पारनेर असा ४० किमी प्रवास दररोज करणने केला आहे. शाळेमध्ये देखील कोणत्याही दिवशी सुट्टी न घेता नीटची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाले असे चुलते विजय ठुबे यांनी सांगितले. करणचे धाकटे चुलते डॉ. शिवाजी ठुबे सेंट्रल गव्हर्मेंट मध्ये कीटक शास्त्रज्ञ पदावरती कार्यरत आहेत. कारणच्या या यशाबद्दल खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते सर, बाबुर्डी गावचे सरपंच इश्वर दिवटे, माजी सरपंच प्रकाश गुंड, भोयरे गांगर्डाच्या माजी सरपंच भामाबाई भैय्यासाहेब रसाळ, मा. सरपंच भाऊसाहेब भोगाडे, पत्रकार शरद रसाळ आदींनी अभिनंदन केले आहे.