पारनेर । नगर सहयाद्री:-
सामाजिक बांधिलकी जपत उद्योगक्षेत्रातून समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लागत आहे. ‘कन्हैय्या अॅग्रो’ कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देत सामाजिक जबाबदारी जपली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘कन्हैय्या अॅग्रो’ कंपनीने राज्य सरकारच्या सामाजिक उपक्रमांना हातभार लावत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचे योगदान दिले असून, हा निधी नुकताच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे, संचालक व नगराध्यक्ष नितीन अडसुळ, संचालक अभय औटी, संचालक विठ्ठल पवार आणि संचालक लिबेश नायर उपस्थित होते. संचालक पठारे म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी, दूध उत्पादक आणि कष्टकरी लोकांसाठी ‘कन्हैय्या अॅग्रो’ कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आधुनिक शेती, पशुखाद्य कृषीउपयोगी साधनसामग्री तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी संस्था नेहमीच पुढाकार घेत असल्याची माहिती दिली.
सामाजिक जबाबदारी महत्त्वाची
उद्योग व्यवसायाबरोबरच समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे. राज्य सरकार आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा तसेच विविध सामाजिक कार्यांसाठी सहाय्यता निधीतून मदत करते. त्यात आपल्या उद्योगगटाचे योगदान होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
– सुरेश पठारे, कार्यकारी संचालक, कन्हैय्या अॅग्रो