पारनेर । नगर सहयाद्री
ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, शेतीपूरक उद्योगांना चालना, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या सर्वच बाबतीत कन्हैया ॲग्रो कंपनीने महत्त्वपूर्ण कार्य केले असून, ही कंपनी केवळ नफा कमावण्यासाठी नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कार्यरत असून ग्रामीण भागाची नवसंजीवनी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केले.
गटेवाडी (ता.पारनेर) येथील कन्हैया ॲग्रो कंपनीस माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे, संचालक व नगराध्यक्ष नितीन अडसुळ, संचालक विठ्ठल पवार, अभय औटी, लिबेश नायर तसेच कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
माजी केंद्रीय मंत्री दानवे पुढे म्हणाले, इतर भागात व्यवसाय करण्यापेक्षा आपल्या परीसरात उद्योग उभारण्याचा उद्देश खरोखरच कौतुकास्पद आहे. कन्हैया ॲग्रो ही आता महाराष्ट्रातील आघाडीची शेतीपूरक प्रक्रिया करणारी कंपनी ठरत आहे. यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असून, ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कन्हैया ॲग्रोच्या कार्याची दखल
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कन्हैया ॲग्रो कंपनीला भेट देऊन कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी आमच्या उत्पादनांची माहिती घेतली आणि पशुखाद्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यांबाबत समाधान व्यक्त केले. कंपनीप्रती दाखवलेली त्यांची आपुलकी आमच्या संपूर्ण कन्हैया परिवारासाठी अत्यंत बहुमूल्य आहे.
– सुरेश पठारे, कार्यकारी संचालक, कन्हैया ॲग्रो