अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
स्वस्तात प्लॉट व जमीन देण्याचे आमिष दाखवून नगरमधील एका वैद्यकीय व्यावसायिकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कल्याण (ठाणे) येथील पिता–पुत्रांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संदीप दत्तात्रय खरपुडे (वय ३७, रा. सारसनगर, अहिल्यानगर) हे वैद्यकीय क्षेत्रात व्यवसाय करणारे आहेत. त्यांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून आशिष उमाशंकर पांडे (रा. कल्याण, जि. ठाणे) याच्याशी झाली. आशिषने आपण बांधकाम व्यवसायात असून, अत्यल्प किमतीत प्लॉट्स उपलब्ध करून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. मित्राचा परिचय असल्यामुळे खरपुडे यांनी व्यवहार मान्य केला.
२१ व २२ जानेवारी २०२१ रोजी, त्यांनी आशिष व त्याचे वडील उमाशंकर पांडे यांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग केले. आशिषने १५ दिवसांत जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.मात्र, ठरलेल्या मुदतीनंतरही जमीन देण्यात आली नाही. उलट आशिषने आणखी ५ लाख रुपयांची मागणी केली. खरपुडे यांनी यास नकार दिल्यावर त्याने व्यवहार रद्द करून पैसे परत करतो असे सांगितले.
मात्र त्यानंतर तो सातत्याने संपर्क टाळू लागला. अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर खरपुडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी कल्याण येथील आशिष पांडे व त्याचे वडील उमाशंकर पांडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत.