अहिल्यानगर | नगर सहयाद्री
१६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणात दोषी ठरवले गेलेले दीपक ढाकणे यांची अखेर निर्दोष मुक्तता झाली असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप पुराव्याअभावी फेटाळले आहेत. या निकालामुळे ढाकणे कुटुंबीय व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १४ जुलै २००९ रोजी जेऊर टोलनाका येथे पोलीस बंदोबस्त सुरू असताना, मौफ येथील पिंटू शिंदे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. या प्रकरणात दीपक ढाकणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
सन २०१२ मध्ये अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने ढाकणे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुढे २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर ढाकणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. १३ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात, खटल्यात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे आणि संशयास्पद असल्याचे नमूद करत, ढाकणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे
.न्यायालयाच्या या निर्णयामुळे न्यायप्रेमी वकिलांच्या कार्यक्षमतेचेही कौतुक होत आहे. या खटल्यात दीपक ढाकणे यांची बाजू अॅड. आनंद लांडगे यांनी प्रभावीपणे मांडली. तसेच विश्वजीत कासार यांनीही ढाकणे यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. या निर्णयाची स्थानिक पातळीवर मोठी चर्चा असून, १६ वर्षांनंतर मिळालेल्या न्यायामुळे ढाकणे कुटुंबीय व त्यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.