मुंबई | नगर सह्याद्री
एकीकडे दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला आहे. तर दुसरीकडे मुंबईत उद्धव ठाकरेदेखील रस्त्यावर उतलले आहेत. राज्यातील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर ठाकरे गटकडून आज जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, महाराष्ट्र जागा झाला आहे. सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेण्यासाठी मर्द लागतो, आणि ते मर्द शिवसेनेत आहेत. आजच्या सत्ताधाऱ्यांना डोकं नाही, त्यांच्याकडे फक्त खोके आहेत. खोके घेऊन ते सत्तेत बसले आहेत. महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवली आहे, पण महायुतीने महाराष्ट्राला विकासाच्या नावावर शेवटच्या रांगेत नेऊन ठेवलं आहे.
पुढे ते म्हणाले, ”मी मुख्यमंत्री असताना आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. पण आता भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्यानंतरही मुख्यमंत्री फक्त ’समज देतात. याचे मंत्री डान्सबार चालवतात, कुणी पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. शेतकऱ्यांची थट्टा केली जाते, सभागृहात रमी खेळली जाते. तरी यांना लाज वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. माजी उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यायला लावून वनवासात पाठवलं आहे. कारण त्यांच्यावर सरकारविरोधी कारस्थानाचा संशय होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला. मग राज्यात मंत्र्यांना का समज दिली जाते? त्यांचे राजीनामे का घेतले जात नाहीत? चीनमध्ये सरकारविरोधात बोलणारा माणूस गायब होतो, तसे धनखड गायब आहेत. त्यांचं काय झालं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.