Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी मोठी भेट मिळणार आहे. ९ ऑगस्ट २०२५, रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर योजनेचा जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. यावेळी देखील जुलैचा हप्ता उशिराच मिळणार असला तरी, १५०० रुपयांचा लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येणार असल्याने महिलांमध्ये काही प्रमाणात समाधान आहे. ऑगस्टच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा केला जात असल्याचे पाहता, ऑगस्टचा हप्ता महिनाअखेरीस येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच सरकारकडून स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेतील एक धक्कादायक माहिती म्हणजे, आतापर्यंत ४२ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. काही महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त होते, काही महिला सरकारी नोकरीत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले, तर काहींनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे, सरकारकडून योजनेचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असून, अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.