संगमनेर।नगर सहयाद्री:-
तालुक्यातील मांडवे येथे ट्रकमधून खडी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी एका पत्रकाराने तलाठ्याचे नाव सांगून तक्रारदाराकडे दरमहा चाळीस हजार हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर चर्चा झाल्यावर पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना यूट्युब पत्रकाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (दि.16) रंगेहाथ पकडले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत पत्रकार व कामगार तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मांडवे येथील तक्रारदार यांचा खडी वाहतुकीचा व्यवसाय आहे. सदर वाहतूक ट्रकमधून सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी पत्रकार रमजान नजीर शेख (वय 28, रा. मांडवे, ता. संगमनेर) याने दरमहा चाळीस हजार रुपये द्यावे लागतील असे कामगार तलाठी अक्षय बाबाजी ढोकळे यांनी सांगितले आहे. त्यानंतर तक्रारदाराने दोघांची भेट घेऊन खडी वाहतुकीबाबत चर्चा केली. त्यावर तक्रारदाराने तलाठी ढोकळे यांना सांगितले की, मी तुम्हांला पन्नास हजार रुपये देतो परंतु मला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. या चर्चेनुसार ही रक्कम मी घेतो, पण दोन महिनेच ट्रक चालविता येईल असे सांगून तलाठ्याने लाच स्वीकारण्यास संमती दिली.
त्यानंतर पत्रकार शेख यास गावातील मारुती मंदिरासमोर तक्रारदार यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाई नंतर शेख याने ढोकळे यांना फोनवरुन पैसे दिले असल्याचे सांगितले, तेव्हा उद्या बघू असे म्हणून तलाठ्याने लाचेच्या रकमेस संमती दर्शवून प्रोत्साहन दिले. या पथकात पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, पोहेकॉ. सुनील पवार, पोना. योगेश साळवे व परशुराम जाधव यांचा समावेश होता. याप्रकरणी घारगाव पोलिसांत पत्रकार रमजान शेख व कामगार तलाठी अक्षय ढोकळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.