JEE Main 2025 Results Out::- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शुक्रवारी रात्री जेईई मेन सेशन- २ चा निकाल जाहीर केला. यामध्ये एनटीएने २,५०,२३६ विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरवले आहे. राजस्थानच्या कोटामधील ओमप्रकाश बोहरा या विद्यार्थ्याने जेईई मेन परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. जेईई परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या २४ टॉपर्समध्ये २२ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे. तर पश्चिम बंगालमधील देवदत्त माझी आणि आंध्र प्रदेशातील साई मनोगना गुठीकोंडा या मुलींनी १०० टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.
मागच्या वेळी ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले होते. १०० टक्के गुण मिळवलेल्या २४ उमेदवारांपैकी सर्वाधिक ७ उमेदवार राजस्थानचे आहेत. तर महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी ३, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्लीचे प्रत्येकी २ उमेदवार आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एक उमेदवार आहे. यावर्षी दोन्ही सत्रांसाठी एकूण १५.३९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १४.७५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल सत्रात जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. JEE Main Result 2025 |
JEE Main 2025 सेशन 2 ची परीक्षा ही 2, 3,4 आणि 7 एप्रिल रोजी 2 शिफ्ट्समध्ये झाली होती. पहिली शिफ्ट ही सकाळी 9 ते 12 तर दुसरी शिफ्ट ही दुपारी 3 ते 6 पर्यंत झाली होती. तर 8 एप्रिल रोजी फक्त एकाच शिफ्टमध्ये परीक्षा झाली, त्याची वेळ दुपारी 3 ते 6 अशी होती. पेपर 2A (B.Arch) आणि पेपर पेपर 2B (B.Planning) ची परीक्षा एकाच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली. प्रोव्हिजनल आन्सर की 11 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांना 13 एप्रिलपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. अंतिम उत्तरतालिका आधारे गुणांचे मूल्यांकन करण्यात आले.
‘असा’ तपासाल निकाल?
जेईई परीक्षा दिलेले विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला https://jeemain.nta.nic.in/ भेट देऊन जेईई (मेन) 2025 एप्रिल सत्राचा निकाल पाहू शकतात. विद्यार्थी अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने jeemain.nta.nic.in ला भेट देऊन निकाल आणि स्कोअर कार्ड तपासू शकतात.