शेवगाव । नगर सहयाद्री:-
शेवगाव शहरातील खाटीक गल्ली आणि कुरेशी गल्ली येथील बंद घरांमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर पोलिसांनी छापा टाकला. कारवाई दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली होती. त्यानुसार ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांनी छापा टाकला. खाटीक गल्ली येथील तीन ठिकाणी कत्तलखाने सुरू असल्याचे निदर्शनास आले.
छाप्यात अन्वर शेख अन्वर मोहम्मद (रा. खाटीक गल्ली), वाहीद हरुन कुरेशी व हमजा वाहीद कुरेशी (दोघे रा. कुरेशी गल्ली) हे इसम गोमांस विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी पो.कॉ. शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वाहीद हरुन कुरेशी (वय 48) व हमजा वाहिद कुरेशी (वय 27) यांना अटक करण्यात आली असून, शाकिब बबु कुरेशी व अन्वर मोहम्मद शेख हे फरार आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरिक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकातील पोसई आजिनाथ कोठाळे, पोहेकाँ चंद्रकांत कुसारे, पोकाँ शाम गुंजाळ, पोकाँ राहुल आठरे, पोकाँ आदिनाथ शिरसाठ, पोकाँ मारोती पाखरे, पोकाँ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ रोहीत पालवे, पोकाँ नवनाथ कोठे, मपोहेकाँ गितांजली पाथरकर यांनी केली आहे.
जेसीबीच्या सहाय्याने कत्तलखाने जमीनदोस्त
शेवगाव शहरातील खाटीक गल्ली आणि कुरेशी गल्ली येथील अनधिकृत कत्तलखान्यांवर मोठी कारवाई करत पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने कत्तलखाने जमीनदोस्त केले आहे या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गोमांसातील काही नमुने केमिकल तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून उर्वरित गोमांसाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. शेवगाव पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने सदरची कारवाई केली.