नागपूर । नगर सहयाद्री
मागील आठवड्यात नागपूर शहरातील महाल भागात झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने आज (१६ मार्च) बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरू केली. नागपूर महापालिकेच्या पथकाने नोटीस बजावल्यानंतर फहीम खानच्या घरातील सर्व सामान काढून टाकण्यात आले असून, घर पूर्णतः रिकामे करण्यात आले आहे.
या हिंसाचाराची सुरुवात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झाली. सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या आणि दोन गट आमने-सामने आले. महाल भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि आगजनी झाली. वाहनं फोडण्यात आली, त्यांना आग लावण्यात आली होती. संपूर्ण हिंसाचार प्रकरणात फहीम खान हे मास्टरमाइंड असल्याचे तपासात समोर आले आहे.
फहीम खानच्या यशोदा नगर येथील निवासस्थानावर आज सकाळपासूनच बुलडोझर कारवाई सुरू करण्यात आली. महापालिकेने या घरावर अनधिकृत बांधकाम असल्याचे कारण पुढे करत नोटीस बजावली होती. नोटीस मिळाल्यानंतर फहीम खानच्या कुटुंबीयांनी घर रिकामे केले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी, पोलीस बंदोबस्तासह सकाळी यशोदा नगर भागात दाखल झाले आणि कारवाईला सुरुवात केली.