मुंबई / नगर सह्याद्री : –
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवार पासून उपोषण करणार आहेत. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमीका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला विरोध केला होता.
आंतरवाली सराटी गावातील उपसरपंचांसह ६०ते ७० ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले होते. तसेच प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली होती.
जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.