अहमदनगर। नगर सहयाद्री
सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी तीव्र करण्यासाठी विविध आंदोलने केली जात आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाचे तरुण लोकसभेचे अर्ज भरणार असल्याचे मराठा समाजाने जाहीर केले होते. आता अहमदनगर लोकसभा जागेसाठी ६०० मराठा उमेदवार उभे राहणार असल्याची माहिती समजली आहे. या मतदार संघात लोकसभेसाठी सातशे ते आठशे मराठा उमेदवार अर्ज दाखल करतील अशी माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिली असून त्या संदर्भात तयारी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितले.
* आता पर्यंत मराठा समाजातून इतया उमेदवारांची तयारी
मराठा समाजातून आतापर्यंत साधारण पाचशे जणांची तयारी लोकसभेला उभे राहण्याची झाली आहे. जामखेड येथे १०४ जणांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली असून श्रीगोंदा ३८, कर्जत १२, नगर तालुका ५४, नगर शहर ५५, पाथर्डी ४८, पारनेर २९ जणांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः डिपॉझिट भरून हे उमेदवार उभे राहणार असल्याचे राम जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
* प्रशासनाची डोकेदुखी वाढणार?
प्रत्येक गावातून जास्तीत जास्त ४ तर कमीत कमी २ मराठा उमेदवार अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे. त्यामुळे आता ही गोष्ट प्रशासनाच्या दृष्टीने मोठे डोकेदुखी ठरू शकते. प्रशासन आता यामधून काय मार्ग काढेल हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
* बॅलेट पेपरवर निवडणूक?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील समर्थक आक्रमक झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. जर इतया प्रमाणात उमेदवार उभे राहिले तर बॅलेटपेपरवर निवडणूक होतील अशी सध्या चर्चा आहे.