मंत्री विखे पाटील यांचा शरद पवार यांना खोचक टोला
पारनेर । नगर सहयाद्री-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज महासत्ता बनत आहे. त्यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्यामुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे जाणते राजे देशाचे भवितव्य घडवू शकणार नाहीत असा टोला लगावून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्याचा आपला प्रयत्न असून, आपली भूमिका उद्योग व्यवसाय आणण्याची आहे. इतरांसारखी धाक, दडपशाही करुन घालविण्याची नाही अशी टिका अशी खरमरीत टिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
तालुकयातील टाकळी ढोकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ना.विखे पाटील बोलत होते. यावेळी जेष्ठनेते खिलारी गुरुजी, सुजीत झावरे पाटील, तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, मंगलदास बांगल आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास सर्व क्षेत्रांमध्ये होत आहे. मोदींची गॅरंटी आता देशवासियांना मिळाली आहे. त्यामुळेच त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशातील नागरीक सज्ज झाले असून, ही निवडणूक देशाचे भवितव्य घडविणारी आहे.
कोव्हीड संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांच्या पाठीशी उभे राहीले. मोफत धान्य योजनेपासून ते आयुष्यमान भारत योजने पर्यंत, सामाजिक योजनांना त्यांनी प्राधान्य दिले. जिल्ह्यात किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात ४४ हजार ३८० शेतक-यांना ६७ कोटी ७१ लाख रुपयांचे अनुदान आले. राज्य सरकारने सुरु केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ १ लाख २७ हजार शेतक-यांना झाला आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री मागील अडीच वर्षे फक्त घरात बसून होते. नगर जिल्ह्यासाठी कोणतीही मदत महाविकास आघाडीचे नेते करु शकले नाहीत. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आपली भूमिका असून, तालुका आता बागायती कसा होईल यासाठी सुध्दा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करुन देण्यासाठी अनेक उद्योग नव्याने आणण्याची आपली भूमिका आहे. इतरांसारखी उद्योजकांना धाक दडपशाहीने पळवून लावण्याची भूमिका आमची नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
याप्रसंगी सुजीत झावरे यांनी आपल्या भाषणात पारनेर तालुकयातून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. मंगलदास बांगर यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांनी आपल्या पुतण्याला या निवडणूकीत उभे का केले नाही असा सवाल उपस्थित केला. धनगर समाजाचे नेते बाचकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सभेपुर्वी मंत्री विखे पाटील यांचे ग्रामस्थांनी मिरवणूक काढून स्वागत केले होते.