जामखेड। नगर सहयाद्री:-
येथील आनंदवाडी परिसरातील पत्र्याच्या शेडमधून एकाच वेळी सोयाबीनच्या तब्बल ३५ गोण्या चोरून नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यांत वापरलेले ५ लाख रुपये किमतीचे वाहन व १ लाख २९ हजार रुपये किंमतीच्या ९० सोयाबीनच्या गोण्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दादाराव शामराव शिंदे (वय ५०), अनिल भिमराव शिंदे (वय ५३), संजय सुभाष पवार (वय ३०), सुनील भिमराव शिंदे (वय ३६), विशाल दादाराव शिंदे (वय २२), शंकर विलास शिंदे (वय ३५), आदिनाथ आबा शिंदे (वय ५०, सर्व रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशीव), शंकर लगमन काळे (वय ४२, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यांना अटक केली आहे.
आनंदवाडी परिसरातील शेतकरी बाळु महादेव गिते यांच्या पत्र्याच्या शेडमधील ३५ सोयाबीनच्या गोण्या व ५ गॅस टाक्या चोरीस गेल्या होत्या, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. हा गुन्हा दादासाहेब शामराव शिंदे याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो त्याच्या साथीदारांसह मांडवा (ता. वाशी) येथे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे विचारणा केलीअसता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच जामखेड तालुक्यातील नागेबाचीवाडी, नायगाव, झिक्री व राजुरी येथून सोयाबीनच्या गोण्या चोरून नेल्याबाबतची माहिती सांगितल्याने खर्डा व जामखेड पोलीस ठाण्यातील ५ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.