संगमनेर । नगर सहयाद्री:-
संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेसह इतरही पाणीपुरवठा योजनेची अतिशय बिकट परिस्थिती आहे. या योजनेमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. मूठभर ठेकेदारांनी सरकारचा पैसा खिशात घातला आहे. यामुळे त्यांचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे, असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथे ग्रामस्थ व महायुतीतर्फे मंत्री विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या येथील श्री श्री १००८ परमहंस आचार्य व महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, प्रमोद राहाणे, श्रीराज डेरे, संतोष रोहोम, भारत फाउंडेशनचे विनोद गायकवाड, वाड, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, सुदाम सानप, काशिनाथ पावसे, शरद गोर्डे, सरपंच सुभाष गडाख, कविता पाटील, रऊफ शेख आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारासाठी तीन औद्योगिक वसाहतींना जागा उपलब्ध करून दिली आहे. संगमनेरला औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे सूतोवाच करून औद्योगिक वसाहती करिता आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र तातडीने संगमनेरमध्ये सुरू करणारअसल्याचे त्यांनी जाहीर केले.
मागील अडीच वर्षात संगमनेर तालुक्यातील विकास कामांसाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. एकट्या हिवरगाव पावसा गावाला १२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अनेक वर्षांपासून या तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरू शकले नाही. जलनायकांच्या ठेकेदारांनीच पाणी पुरवठा योजनांचा निधी खिशात घातला. त्यांचा बंदोबस्त करणार आहे. साकूरच्या उपसा सिंचन योजनेबरोबरच भोजापूर चारीचे काम पूर्ण करून जिरायत भागाला पाणी देणार असल्याचे ते म्हणाले.