जैन मंदिर ट्रस्ट प्रकरणी काळे, गुंदेचा यांनी दिली तक्रार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर), कापड बाजार यांच्या मालकीच्या असणाऱ्या स्टेशन रोड वरील अक्षता गार्डन समोरील भूखंडावर असलेले मंदिर, प्रवचन स्थळ संगनमत करत पाडून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आ. संग्राम जगताप, गणेश हरिभाऊ गोंडाळ, ट्रस्ट अध्यक्ष सुभाष झुंबरलाल मुथा, ट्रस्टचे सर्व ट्रस्टी यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे, जैन समाजाचे मनोज सुवालाल गुंदेचा यांनी ही तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे यावेळी तात्काळ सखोल तपास करण्याची मागणी काळे, गुंदेचा यांनी केली.
गुरुवारी पत्रकार परिषदेत माजी आ. रवींद्र धंगेकर, खासदार निलेश लंके यांनी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही तक्रार दाखल झाली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ट्रस्टच्या नावे स्टेशन रोड वर भूखंड आहे. या भूखंडावर असणाऱ्या मिळकतीच्या तपशिलाची नोंद नगरपालिका दप्तरी परिशिष्ट – अ मध्ये आहे. या भूखंडावर मंदिर होते. अशी नोंद महानगरपालिका दप्तरी परिशिष्ट – अ मध्ये स्पष्ट नोंद नमूद आहे.
त्याचे पुरावे काळे, गुंदेचा यांनी पोलिसांना दिले आहेत. तक्रारीत पुढे म्हटले आहे, जैन समाजाचे ’तीर्थंकर’ भगवान ऋषभनाथ, भगवान महावीर यांनी जैन तत्त्वज्ञान शिकवले आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले. भगवान महावीरांचे उपदेश अहिंसा, सत्य, अस्तेय या महाव्रतांवर आधारित आहेत. आम्ही त्याचे आचरण करतो. जैन मंदिर ट्रस्टच्या वर नमूद भूखंडावरील मंदिर तसेच प्रवचन स्थळ पाडण्यात आले आहे. या मुळे आमच्या धार्मिक आस्था, भावना दुखावल्या गेल्या आहेत. अपराध्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा असे तक्रारीत म्हटले आहे.



