अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा भूखंड हडप करत मंदिर, प्रवचन स्थळ पाडून त्या ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यालय थाटल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. या प्रकरणात तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे काळे यांनी पुण्यात सह धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
याबाबतचे अनेक कायदेशीर पुरावे, मनपाचे दस्तऐवज त्यांनी माध्यमांद्वारे समाजा समोर आणले. खासदार सुप्रिया सुळे, खासदार नीलेश लंके, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील काळे यांच्या कारवाईच्या मागणीचे समर्थन केले आहे. हडप केलेला संपूर्ण भूखंड खाली करून तो तत्काळ ट्रस्टला हस्तांतरित करावा, या कारवाई साठी विशेष व्यक्तीची नेमणूक करावी, ट्रस्टने धर्मदायीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, तसेच देणगीदाराच्या मृत्युपत्रातील अटी शतचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या संबंधित जागेत भाडेकरू ठेवला आहे.
याप्रकरणी सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलनावेळी काळे यांनी केल्या. यावेळी जागेचा ताबा ट्रस्टला देण्याची कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल. वेळप्रसंगी प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
धमकावल्याचा आरोप
किरण काळे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. काळे म्हणाले, पुण्याच्या प्रकरणावरून अहिल्यानगरमध्ये मोर्चा निघाला. मात्र अहिल्यानगरमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. काही समाज बांधवांनी या विषयाबाबत बैठक घेतली. मात्र त्याची माहिती समजताच लोकप्रतिनिधींनी त्यांना धमकावले. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणाऱ्या मात्र स्वभावाने गरीब असणाऱ्या, व्यापारी समाजाचा आवाज सत्ता, दहशतीच्या जोरावर दाबला जात असल्याचे काळे म्हणाले.



