अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नागारोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत तसेच नागरी दलित दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांच्या विकास कामांकरिता सुमारे २६ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या या विकास निधीमधून शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण, पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन तसेच बगीचा विकसित करणे, परिसर सुशोभिकरण आदी मूलभूत व महत्वाचे विकास कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी शासकीय मंजुरी मिळाली असून निधीही उपलब्ध झाला आहे. लवकरच शहरातील सर्व कामांना प्रारंभ होणार आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत शहरातील विविध कामांचे प्रस्ताव सादर करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यास मंजुरी मिळाली असून महाराष्ट्र सुवर्णजयंती नागारोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत १६ कोटी तसेच नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत होणाऱ्या विविध कामांसाठी १० कोटी असा तब्बल २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनीही पाठपुरवठा व प्रयत्न केला आहे.
नगर शहराच्या विकासासाठी राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी वेळोवेळी सहकार्य करून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात नगर शहरातील प्रत्येक भागातील समस्या सोडवण्यासाठी निधी प्राप्त होणार असून नगर शहरात विकासाची गंगा आणली जाणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिली.



