शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, नागरिक भयभीत
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरामध्ये एकीकडे विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत असून या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र दुसरीकडे मनपा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. सध्या कचरा संकलनाचे तीन तेरा वाजले असून सर्वत्र रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसत आहे. याची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखील वारे, अशोक बढे यांनी महापालिका प्रशासनाला नागरिकांना सोयी सुविधा देण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रभागामध्ये घंटागाडी येत नसल्यामुळे नागरिकांच्या घरी कचरा साठवून ठेवला जातो. त्याची दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. प्रभागामध्ये एकीकडे विकासाची कामे चालू आहे. मात्र पालिका अधिकाऱ्यांच्या हलगजपणामुळे झालेल्या विकास कामाच्या परिसरात मोठमोठे कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहे.
भिस्तबाग महाल परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाची व सुशोभीकरणाची काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी कचऱ्याचे ढीग, मोकट कुत्रे पाहावयास मिळत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये घंटागाडी व कचरा संकलन करण्याचा प्रश्न माग न लागल्यास महापालिकेमध्ये कचरा टाकला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे.
मोकाट कुत्र्यांचा सर्रासपणे वावर
अहिल्यानगर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सर्रासपणे वावर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मनपाकडून कुठल्याही उपयोजना होताना दिसत नाही. शहरात रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या पाहावयास मिळत आहे. ही हिंसक कुत्री हल्ला करत असल्यामुळे नागरिक भयभीत झालेत. मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केली.
दहा दिवसांपासून घंटागाडी येईना, प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य: बडे
प्रभाग सातमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून घंटागाडी नागरिकांच्या घरी आठ ते दहा दिवस झाले तरी येत नाही. त्यामुळे नागरिकांना आपला कचरा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. कचरा संकलनाचे काम देखील होत नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेवर प्रशासन राज आल्यापासून नागरिकांचे मूलभूत प्रश्न देखील माग लागत नसल्यामुळे नागरिक महापालिकेच्या कामकाजावर नाराज आहेत. तेव्हा हे सारे प्रश्न माग न लावल्यास आंदोलन छेडू असा इशारा अशोक बडे यांनी निवेदनात दिला आहे.