Rain update:मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही भागात जोरदार पाऊस झाला नाही. मात्र आजपासून पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे लवकर आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आज शनिवारी आणि उद्या रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे.