मुंबई । नगर सहयाद्री:-
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. यात शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात असून दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर कोकण, मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट दिली आहे.
कुठे धो धो तर कुठे मुसळधार…
आजपासून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर उर्वरीत राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. 27 सप्टेंबरला कोकण, पुणे-सातारा-कोल्हापूर घाटमाथ्यासह, सोलापूर लातूर, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर 28 सप्टेंबरला कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर मुंबई महानगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे शक्यता आहे.